आ.डॉ राहुल पाटील यांचे नेतृत्व, प्रत्येक गावात सोयाबीन केंद्र सुरू करा
परभणी: जिल्ह्यातील प्रत्येक गावात शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सुरू करावीत व कापसाला दहा हजार रूपये हमी भाव द्यावा या व इतर मागण्यांसाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आ. डॉ.राहुल पाटील यांच्या नेतृत्वात झोपेचे सोंग घेतलेल्या राज्य सरकारला जागे करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवार दिनांक 11 रोजी ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले.
शिवसेनेच्या वतीने यावेळी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. परभणी जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना विविध समस्या भेडसावत आहेत,अशा स्थितीत शासन दखल घेत नसल्याने आमदार डॉ. पाटील यांनी सरकारला जागे करण्यासाठी आंदोलनाचा निर्णय घेत थेट जिल्हाधिकारी कार्यालयातच ढोल वाजवत झोपेचे सोंग घेतलेल्या राज्य सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला.आमदार डॉ. पाटील यांच्या आक्रमक भूमिकेमुळे संपूर्ण प्रशासन हादरून गेले, हजारो संख्येने शेतकरी, शिवसैनिक जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. ढोल बजावत सरकारला इशारा दिला गेला.
यावेळी बोलताना आ.डॉ.पाटील म्हणाले सरकार केवळ कंत्राटदार आणि उद्योगपतींचे आहे. त्यांना शेतकऱ्यांशी काही देणे घेणे नाही, शेतकऱ्यांना सरकारने वाऱ्यावर सोडले आहे अतिवृष्टीमुळे शेतकरी आधीच संकटात असताना आता सोयाबीनची भाव देखील पाडले जात आहेत, सरकारला याची किंमत चुकवावी लागेल असा इशारा आमदार पाटील यांनी यावेळी बोलताना दिला.
परभणी जिल्ह्यात प्रत्येक गावात सोयाबीनचे हमीभाव खरेदी केंद्र सुरू करावेत, सोयाबीनला सात हजार रुपये तर कापसाला दहा हजार रुपये हमीभाव द्यावा, नाफेडची खरेदी केंद्र तात्काळ सुरू करावीत, सीसीआयची केंद्र सुरू करावीत शेतकऱ्यांना 24 तास वीज पुरवठा करावा यासह बॉण्ड ची किंमत शंभर रुपये पूर्ववत ठेवावी, 100 टक्के पीक विमा देण्यात यावा, आनंदाचा शिधा कपात न करता संपूर्णपणे वाटप करावा, खाद्यतेल, पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर कमी करावेत, अशा मागण्या यावेळी आमदार पाटील यांनी केल्या. आंदोलन केल्यानंतर आमदार पाटील यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची भेट घेऊन त्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख डॉ.विवेक नावंदर, उपजिल्हा प्रमुख सदाशिव देशमुख, तालुकाप्रमुख नंदकुमार अवचार, अनिल डहाळे, अरविंद देशमुख, संग्राम जामकर, रवि पतंगे,दिनेश बोबडे, ज्ञानेश्वर पवार, बंडूनाना बिडकर, अर्जुन सामाले, सुनिल पंढरकर, संदिप झाडे, सुभाष जोंधळे, विशु डहाळे, बाळराजे तळेकर, अमोल गायकवाड, रामराव डोंगरे, दत्तराव मुळे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी व शिवसैनिक उपस्थित होते.