Ø प्रधानमंत्र्यांच्याहस्ते बंजारा विरासत संग्रहालयाचे उद्घाटन
Ø 9.5 कोटी शेतकऱ्यांना पीएम किसानच्या निधीचे वितरण
Ø नमो शेतकरी महासन्मान योजनेचा शेतकऱ्यांना पाचवा हप्ता
Ø 23300 कोटीच्या कृषी आणि पशुसंवर्धन उपक्रमांचा शुभारंभ
Ø कृषी पायाभूत सुविधेंतर्गत 7,500 हून अधिक प्रकल्प समर्पित
Ø पशुधनासाठी स्वदेशी बनावटीच्या लिंग-वर्गीकृत वीर्य तंत्रज्ञानाचा शुभारंभ
Ø राज्यातील 19 मेगावॅटच्या पाच सौर ऊर्जा पार्कचे लोकार्पण
वाशिम – बंजारा समाजाने देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाची भूमिका निभावली. देशाच्या विकासासाठी प्रत्येक क्षेत्रात या समाजाचे काम केले. समाजाने खुप संत दिले. या संतांनी देशाच्या आध्यात्मिक क्षेत्राला उर्जा दिली. बंजारा विरासत संग्रहालयामुळे समाजाची महान संस्कृती, प्राचिन परंपरा देशाच्या नवीन पिढीला परिचित होईल, असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते बंजारा विरासत संग्रहालयाचे उद्घाटन, किसान सन्मान संमेलन तथा विविध विकास कामांचे लोकार्पण, लाभाचे वितरण झाले. त्यावेळी प्रधानमंत्री बोलत होते. यावेळी राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय कृषि मंत्री शिवराज सिंग चौहान, मत्स्यपालन व पशुसंवर्धन मंत्री राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, पालकमंत्री संजय राठोड, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, कृषी मंत्री धनंजय मुंडे, खा.अनुप धोत्रे, आ.चंद्रशेखर बावनकुळे, आ.निलय नाईक, आ.भावना गवळी, आ.किरण सरनाईक, आ.लखन मलिक, आ.वसंत खंडेलवाल, जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे आदी उपस्थित होते.
बंजारा समाजाच्या विरासत संग्रहालयाचे उद्घाटन करण्याचे भाग्य लाभले. उद्गाटनानंतर समाजातील काही लोकांना भेटलो. संग्रहालयामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वांनी या संग्रहालयाला भेट द्यावी, असे आवाहन करतो. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या काळात या संग्रहालयाच्या विकासासाठी प्रयत्न केले, त्यामुळे त्यांचे कौतुक करतो. संग्रहालयामुळे समाजाची महान संस्कृती, प्राचिन परंपरा देशाच्या नवीन पिढीला परिचित होईल, असे प्रधानमंत्री म्हणाले.
बंजारा समाजातील महापुरुषांनी देशाला खूप मोठे योगदान दिले. राजा लकी सिंग, संत सेवालाल महाराज, स्वामी हाती राम, संत रामराव बापू महाराजांसह अनेक संत, महंतांनी समाजाला निर्णायक नेतृत्व दिले व उत्तम मार्गदर्शन केले. केंद्र शासन या समाजाच्या विकासासाठी कार्य करीत आहे. राज्य शासनाने संत सेवालाल तांडा समृद्धी अभियान राबवून या समाजाला सक्षम करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले, असल्याचे प्रधानमंत्री म्हणाले.
नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर पीएम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्याचे भाग्य मला मिळाले आहे. केंद्राच्या योजनेसोबतच महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजनेतून निधी देत असल्याने येथील शेतकऱ्यांना दुप्पट लाभ होत आहे. केंद्र सरकारचा प्रत्येक निर्णय विकसित भारताच्या दिशेने कार्यरत आहे. शेतकऱ्यांना सक्षम करण्याच्यादृष्टीने विविध पावले उचलण्यात येत आहेत. आज शेतकऱ्यांच्यादृष्टीने महत्त्वाच्या प्रकल्पांचे व योजनांचे लोकार्पण झाले हे या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे.
महाराष्ट्र सरकारने ५० हजार करोड रुपयांच्या वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्पाला मंजूरी दिली आहे. या प्रकल्पामुळे नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यांतील १० लाख एकर जमीन सिंचनाखाली येणार आहे. सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकार मदत करत आहे. अमरावती येथील नुकतेच टेक्सटाईल पार्कचे उद्घाटन माझ्या हस्ते झाले. राज्य शासनाने सुरु केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नारी शक्तीला सशक्त करणारी योजना असल्याचे प्रधानमंत्र्यांनी सांगितले.
संग्रहालयामुळे बंजारा संस्कृती, परंपरांचे दर्शन घडेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
बंजारा संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या नगारा विरासत संग्रहालयाचे उद्घाटन हा ऐतिहासिक व सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा दिवस आहे. खऱ्या अर्थाने पोहरादेवी येथे काशी उभी राहिली असून बंजारा संस्कृती, परंपरांचे दर्शन होणार आहे. जगण्यासाठी भटकंती करणाऱ्या बंजारा समाजाला संत सेवालाल महाराजांनी जगण्याचा मार्ग दाखविला. प्रामाणिकपणे जगण्याचा प्रयत्न करणाऱ्या या समाजाने आपली संस्कृती जपली. आता त्यांच्या या संस्कृतीचे जतन संग्रहालयाच्यामाध्यमातून होणार आहे. संत सेवालाल यांच्या स्मारकामुळे राज्याला पुढे घेवून जाण्यासाठी प्रेरणा मिळेल. राज्य शासनाने या प्रकल्पासाठी 700 कोटीचा निधी वितरित केला आहे.
सबका साथ सबका विकास हे ब्रीद घेऊन चालणारे नरेंद्र मोदी यांनी संत सेवालाल महाराजांचे तत्व स्वीकारले आहे. प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वात देशाचा विकास होत आहे, ही देशासाठी अभिमानास्पद बाब आहे. राज्यातील जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यात येत आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना सशक्त करण्याचे कार्य सुरू असून ही योजना कधीही बंद होऊ देणार नाही. या योजनेतून राज्यातील २ कोटी पेक्षा अधिक महिलांना तीन महिण्यांचे सहाय्य वितरण करण्यात आले आहे. राज्य सरकार समाजातील शेतकरी, कष्टकरी, युवक अशा सर्व घटकांना न्याय देण्याचे कार्य करीत आहे. त्यामुळे राज्य सरकार हे आता आपले लाडके सरकार झाले आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्र्यांचे आभार मानले.
बंजारा समाजाच्या काशीचा कायापालट केला – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ज्यांनी बाबा विश्वनाथाच्या काशीचा कायापालट केला आज बंजारा समाजाच्या काशीचा कायापालट पाहण्याकरीता व त्याच्या उद्घाटनासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आले आहेत. मोदीजींचे बंजारा समाजाशी एक घट्ट नाते आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर नरेंद्र मोदी हे पोहरागडाला भेट देणारे पहिले प्रधानमंत्री आहेत.
राज्याचा मुख्यमंत्री असताना रामराव बापूंनी मला पोहरादेवीच्या विकासाची जबाबदारी दिली होती. या ठिकाणी आज बंजारा विरासत संग्रहालय उभे राहिले आहे. मंदिराचा विकास झाला आहे. पाहिलेले स्वप्न आज आम्ही पूर्ण केले. मोदीजींनी किसान सन्मान योजना आणि राज्य शासनाने नमो किसान महासन्मान योजना आणली. या योजनांचे हप्ते प्रधानमंत्र्यांच्याहस्ते आज वितरीत करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचे आश्वासन राज्य शासनाने पूर्ण केले. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज पाच सौर उर्जा प्रकल्पांचे उद्घाटन होत आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल श्री.फडणवीस यांनी देखील प्रधानमंत्र्यांचे आभार मानले.
विरासत संग्रहालय गौरवाचे प्रतिक – उपमुख्यमंत्री अजित पवार
बंजारा विरासत संग्रहालय हे बंजारा समाजाची संस्कृती, परंपरा, वारसा, अस्मिता, इतिहास याचे गौरवशाली प्रतीक ठरेल. या संग्रहालयाच्या रूपाने एक वैभवशाली व भव्य वास्तू येथे उपलब्ध झाली. संग्रहालयाच्या माध्यमातून निसर्ग पुजक लढवय्या बंजारा समाजाच्या संस्कृती, परंपरांचे सर्वांना दर्शन घडेल असा मला विश्वास आहे.
या संग्रहालयासह विकास आराखड्याची सुरुवात देवेंद्र फडणवीस यांनी 2017 मध्ये 25 कोटी रुपये देऊन केली होती. नंतर श्री.फडणवीस यांनी 100 कोटीचा निधी जाहीर केला. त्यानंतर आता 700 कोटींचा आराखडा शासनाने मंजूर केला आहे. पोहरादेवी तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी दिले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल प्रधानमंत्र्यांचे आभार मानले.
बंजारा समाजाच्या विकासासाठी राष्ट्रीय स्तरावर प्रयत्न व्हावे – पालकमंत्री संजय राठोड
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे पोहरादेवी येथे आगमन म्हणजे बंजारा समाजासाठी आणि महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. बंजारा समाजाचा इतिहास गौरवशाली आहे. देशातील या समाजाला राज्यघटनेच्या एका सूचित आणण्यासाठी सहानुभूतीपूर्वक विचार होणे आवश्यक आहे. देशभर बंजारा समाजाची संस्कृती व भाषा एकसारखी आहे. त्यामुळे बंजारा भाषेला संरक्षित करण्यासाठी तिचा राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचित समावेश करण्यात यावा, असे पालकमंत्री म्हणाले.
बंजारा तांड्यांचा चतुरस्त्र विकास होण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर तांडा विकास महामंडळ स्थापन करण्याबद्दल सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा. स्वदेश योजनेंतर्गत पोहरादेवीच्या विकासासाठी केंद्र शासनाची मदत आवश्यक आहे. यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यांमध्ये रोजगाराच्या पाहिजे त्या प्रमाणात संधी उपलब्ध नाहीत. त्यामुळे या दोन जिल्ह्यांत रोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी जीएसटीसह अन्य करांमध्ये सूट मिळणे आवश्यक असल्याचे पालकमंत्री म्हणाले.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र शासन सातत्याने शेतकरी हिताचे उपक्रम राबवत आहे. सोयाबीन उत्पादकांना दिलासा देण्यासाठी सोयाबीन तेलाच्या आयात निर्यातीच्या दरात आवश्यक बदल करण्यात आले. शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा यासाठी उत्पादन खर्चाच्या ५० टक्के अधीक दर देऊन किमान आधारभूत किंमत ठरविली जात आहे. युरीया आणि डीएपीचे दर शेतकऱ्यांना परवडण्यासारखे नाहीत, त्यामुळे यावर शासन मोठ्या प्रमाणावर अनुदान उपलब्ध करून देते, असे श्री.चौहान म्हणाले.
केंद्रीय मत्स्यपालन व पशुसंवर्धन मंत्री राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंग म्हणाले, पशुधनासाठी युनिफाईड जिनोमिक चिप आणि स्वदेशी बनावटीच्या लिंगवर्गीकृत वीर्य तंत्रज्ञानाचा प्रधानमंत्र्यांच्याहस्ते शुभारंभ होत आहे. शेतकऱ्यांच्या पशुधनात वाढ होण्यासाठी शेतकऱ्यांना परवडणाऱ्या किंमतीत लींग वर्गीकृत वीर्याची उपलब्धता वाढविण्यासाठी हा उपक्रम सुरु करण्यात येत आहे. यामुळे वीर्याची मात्रा सुमारे २५० रुपयांपर्यंत उपलब्ध होतील. देशी पशुधनासाठी युनिफाईड जिनोमिक चिप, गौचिप आणि म्हशींसाठी माहीचिप जिनोटायपिंग सेवांसह विकसित करण्यात आल्या आहे. जनुकीय निवडीच्या अंमलबजावणीमुळे तरुण उच्च दर्जाच्या बैलांची कमी दरात निवड करणे शक्य होणार असल्याचे ते म्हणाले.
विविध उपक्रमांचा शुभारंभ, लोकार्पण व लाभाचे वितरण
प्रधानमंत्र्यांनी सुरुवातीस बंजारा विरासत संग्रहालयाचे लोकार्पण केले व पाहणी केली तसेच बंजारा बांधवांशी संग्रहालयात संवाद साधला. मुख्य समारंभात 9.4 कोटी शेतकऱ्यांना 20 कोटी रुपयांचा पीएम किसान सन्मान निधीचा 18 वा हप्ता वितरित केला. सोबतच राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सुमारे 2 हजार कोटी रुपयांच्या 5 व्या हप्त्याचेही वितरण केले. सुमारे 23 हजार 300 कोटी रुपये खर्चाच्या कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्राशी संबंधित अनेक उपक्रमांचा शुभारंभ केला.
प्रधानमंत्री कृषी पायाभूत सुविधा निधी अंतर्गत 1 हजार 920 कोटी रुपयांचे 7,500 हून अधिक प्रकल्प राष्ट्राला समर्पित केले. सुमारे 1 हजार 300 कोटी रुपयांची एकत्रित उलाढाल असलेले 9,200 शेतकरी उत्पादक संघटना राष्ट्राला समर्पित केल्या. पशुधनासाठी युनिफाईड जिनोमिक चिप आणि स्वदेशी बनावटीच्या लिंग-वर्गीकृत वीर्य तंत्रज्ञानाचा शुभारंभ करण्यात आला. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना – 2.0 अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात 19 मेगावॅट क्षमतेचे पाच सौर ऊर्जा पार्कचे लोकार्पण करण्यात आले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेशाचे वितरण करण्यात आले.